जेवणानंतर ताक पिण्याचे ५ फायदे! छान-गोडसर चवीचं ताक प्या आणि तब्येतीच्या अनेक तक्रारी टाळा..

जेवणानंतर ताक पिण्याचे ५ फायदे! छान-गोडसर चवीचं ताक प्या आणि तब्येतीच्या अनेक तक्रारी टाळा..

जेवणानंतर ताक पिण्याचे ५ फायदे! छान-गोडसर चवीचं ताक प्या आणि तब्येतीच्या अनेक तक्रारी टाळा..

ताक पिण्याचे फायदे

उन्हाळा सुरु झाल्यावर आपण शहाळ्याचे पाणी, फळांचे रस, ताक, सरबतं अशा अनेक शीतपेयांचा आपल्या आहारात समावेश करतो. रणरणत्या उन्हांत शरीराला थंडावा मिळवून देणारी ही शीतपेय फारच उपयुक्त ठरतात. आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही पेय नियमीत आहारात असावीत असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. प्राचीन काळापासून जेवणासोबत दही किंवा ताक वाढण्याची पद्धत आहे. आयुर्वेदात ताकाला ‘अमृतपेय’ असं म्हटलं आहे. कारण ताकामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. उन्हाळ्यांत शरीरातील उष्णता व दाह कमी करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते.

‘ताक पिणे’ हा उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. परंतु ताक पिताना आपल्याला काहीवेळा प्रश्न पडतो की ताक कधी प्यावे? जेवणांनंतर प्यावे की जेवणा आधी यांसारख्या गोष्टींचा संभ्रम आपल्या मनात असतो. त्यामुळे ताक नक्की कधी प्यावे? व त्याचे फायदे काय हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.न्यूट्रीशियस बाइट्सच्या संस्थापिका व वेट लॉस एक्स्पर्ट, पलकी चोप्रा सांगतात, “ताक हा प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत आहे. ताकाचे सेवन केल्याने, त्यातील प्रथिने तुमच्या शरीराला व स्नायूंना निरोगी बनवतात, त्याचप्रमाणे त्वचेची चमक राखण्यात व हाडे बळकट करण्यास मदत करतात. ताकामध्ये, दुधापेक्षा कमी कॅलरीज असून, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ आणि पोटॅशियम यांचे प्रमाण अधिक असते. दिवसांतील कोणत्याही वेळी आपण ताकाचे सेवन करु शकता”(5 Wonderful Benefits Of Having Buttermilk Post Meals).

जेवणांनंतर ताक पिण्याचे मुख्य ५ फायदे :-

१. अन्न पचण्यास मदत होते :- आपल्यापैकी अनेकांना जेवल्यानंतर ताक पिण्याची सवय असते. ताक हे आपल्या पचनसंस्थ्येसाठी वरदान असल्याचे मानले जाते. जेवणानंतर ताक पिणे ही एक चांगली सवय आहे. ताकात असणारे चांगले बॅक्टेरिया व लॅक्टिक अ‍ॅसिड हे अन्न पचविण्यासाठी तसेच मेटाबॉलिझमचा वेग सुधारण्यास उपयुक्त ठरते. यामुळेच जेवणानंतर ताक पिणे फायदेशीर ठरते.

२. पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी :- ताकाचे सेवन केल्यामुळे जेवलेले अन्न पचनास मदत होते. यांचबरोबर ताकात असणाऱ्या लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे आपले पोट नियमित साफ रहाते. पोट नियमित साफ राहिल्यामुळे पोटासंबंधीचे आजार व समस्या होण्याची शक्यता कमी होते. आपल्या दैनंदिन आहारात ताकाचा समावेश केल्याने पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी दूर होतात. ताक प्यायल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ज्या लोकांचे पोट स्वच्छ होत नाही किंवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लोकांनी नियमित स्वरुपात ताकाचे सेवन करावे.

३. अ‍ॅसिडिटी कमी होते :- बऱ्याचदा बाहेरचे जंकफूड किंवा तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे आपल्याला अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात. अशावेळी, एक ग्लास ताकामध्ये काळीमिरी पावडर किंवा सुंठ पावडर मिसळून या ताकाचे सेवन करावे. यामुळे ताकातील लॅक्टिक अ‍ॅसिड आपल्या पोटातील अ‍ॅसिडिटी कमी करते. तसेच काळीमिरी पावडर आणि ताकाचा थंडावा यामुळे छातीत होणारी जळजळ कमी होते. नियमित स्वरुपात ताक प्यायल्यास गॅस, अपचन आणि पोट जड होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही.

४. प्रतिकारशक्ती चांगली राहते :- प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे. ताकामुळे आपल्याला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आजारपणातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीही निर्माण होते. धावपळीचे आयुष्य, कामाचा ताणतणाव, वेळी-अवेळी खाण्यापिण्याची सवय यामुळे आपल्या शरीरावर याचे दुष्परिणाम होतात. व्यग्र जीवनशैलीमध्ये प्रतिकारशक्ती निरोगी ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. यासाठीच प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी दररोज ताकाचे सेवन करावे.

५. डिहाड्रेशनपासून बचाव होतो :- दह्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळण्यामुळे ताक तयार होते. त्यामुळे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ताकामध्ये ९०% पाणी व पोटॅशिअमसारखे इलेक्ट्रोलेट असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याची गरज असते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. मात्र जर आपण नियमितपणे ताक पित असाल तर आपले शरीर सतत हायड्रेट राहते आणि डिहाड्रेशन होत नाही.

This post was last modified on Tháng mười một 18, 2024 1:13 chiều